Definition List

LightBlog
Viral Gawali

Monday, July 23, 2018

मालेगाव

मालेगाव 


महाराष्ट्र राज्याच्या नाशिक जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण व नाशिक खालोखालचे मोठे उद्योगप्रधान शहर. ते मुंबई - आग्रा राष्ट्रीय महामार्गावर मुंबईच्या ईशान्येस सुमारे 248 कि.मी. व मनमाडच्या उत्तरेस सुमारे 38.62 कि.मी. अंतरावर मोसम नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. लोकसंख्या 2,45,769 (1981). शहराचे तीन स्वतंत्र भाग आहेत.

(1) जुना भाग (मूळ शहर),

(2) छावणी (कँटोनमेंट) आणि

(3) संगमेश्वर.

      येथील नदीकाठचा किल्ला नारोशंकर यांनी बांधला असून (1740) उत्तर पेशवाईत त्याचा संरक्षणाची गढी म्हणून उपयोग होई. इंग्रजांनी दुसऱ्या बाजीरावाचा पराभव केल्यानंतर तो ताब्यात घेतला (1818) आणि तेथे लष्करी तळ ठेवला. या शिवाय गावात सुमारे शंभर लहानमोठी मंदिरे व 43 मशिदी आहेत. पण त्या वास्तुशिल्पशैलीदृष्ट्या विशेष महत्त्वाच्या नाहीत. याशिवाय दोन दर्गे व एक चर्च आहे. तत्पूर्वी येथे अरबांची वस्ती मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्यांपैकी बहुसंख्य मायदेशी परतले.

     कापूसउत्पादन व दळणवळणाची सुलभता यांमुळे मालेगावचे कापड उद्योगातील महत्त्व वाढले आहे. येथे सुमारे 15000 यंत्रमाग व 1500 हातमाग आहेत. यांशिवाय दोरखंड केरसुण्या, बुरूडकाम, चटया इ. लघुउद्योग मोठ्या प्रमाणावर चालतात. कापड उद्योगात येथील मुसलमास मोमीन अग्रेसर आहेत.

       मालेगावी साडी आणि कापड महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. पांझण प्रकल्पामुळे मालेगावचा परिसर सुपीक झाला असून कापूस, भुईमूग, गहू, बाजरी, कांदा इ. प्रमुख पिके मालेगावच्या व्यापारी पेठेत येतात. येथे दर सोमवारी व शुक्रवारी बाजार भरतो.

      तालुक्याची सर्व कार्यालये येथे असून खानदेश उपविभागाची काही महत्त्वाची कार्यालयेही आहेत. नगरपरिषद (स्था. 1863) पाणी, वीज, आरोग्य आदी सुविधांची व्यवस्था पाहते.

      शहरात उर्दू आणि मराठी दोन्ही माध्यमांच्या 60 प्राथमिक शाळा आहेत. येथील शैक्षणिक क्षेत्रात भाऊसाहेब हिरे व त्यांनी स्थापन केलेली महात्मा गांधी विद्यामंदिर ही संस्था यांचे कार्य मोठे आहे. शहरात नऊ माध्यामिक शाळा, मानव्य, वाणिज्य, व शास्त्र महाविद्यालये, दोन शिक्षक - प्रशिक्षण महाविद्यालये, एक तांत्रिक व एक कृषि - विद्यालय आहे.

✍🏼 देशपांडे, सु. र.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers