आज २३ जुलै
आज नाट्य व चित्रपट अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांचा वाढदिवस
जन्म. २३ जुलै १९४७
डॉ. मोहन आगाशे हे अभिनेत्यांच्या वनश्रीतला वटवृक्ष, मराठी रंगभूमीवरचे भीष्म पितामह, काटकोन त्रिकोणातला ९० अंशाचा कोन! म्हणून ओळखले जातात. डॉ. आगाशे व्यावसायिक रंगभूमीवर फारसे दिसत नसले, तरी त्यांच्या भोवती वलय कायम आहे. 'घाशीराम कोतवाल' या मराठी रंगभूमीवरील मैलाचा दगड ठरलेल्या नाटकातील नाना फडणवीसाच्या भूमिकेने हे वलय त्यांच्या भोवती निर्माण केले खरे; परंतु या भूमिकेच्या ही पलीकडे डॉ. आगाशे यांचे कर्तृत्व मोठे आहे. सुरुवातीला पुण्यात सई परांजपे यांच्या बाल नाट्यांमधून आगाशेंनी कामे केली. त्यानंतर मा.राजाभाऊ नातू यांच्या 'महाराष्ट्रीय कलोपासक संस्थे'तून राज्य नाट्यस्पर्धेत नाटके केली. बी. जे. मेडिकल कॉलेज मध्ये शिकत असताना पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेत 'प्रार्थना', 'सरहद्द' अशा एकांकिका त्यांनी गाजवल्या. 'सरहद्द'चे दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल होते. जब्बार पटेलांनी दिग्दर्शित केलेल्या पी.डी.ए.च्या 'अशी पाखरे येती' या विजय तेंडुलकरांच्या नाटकात डॉ. मोहन आगाशे होते. पुढे 'घाशीराम' मुळे पी.डी.ए. फुटली आणि थिएटर अकॅडेमी या संस्थेचा जन्म झाला. डॉ. आगाशेंच्या नाना फडणवीसाचा सर्वत्र बोलबाला झाला होताच; पण थिएटर अकॅडेमीने केलेल्या सतीश आळेकरांच्या 'बेगमबर्वे तल्या शामराव टांगेवाल्याच्या भूमिकेने त्यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला. 'घाशीराम कोतवाल'चा डंका सातासमुद्रा पलीकडेही जो ऐकू गेला त्याला डॉ. आगाशेंचे प्रयत्न प्रामुख्याने कारणीभूत आहेत. १९८० साली लंडनमध्ये 'घाशीराम'चा प्रयोग ब्रिटिशांसमोर सादर झाला. त्यासाठी आगाशे १९७७ सालापासून प्रयत्न करीत होते. त्यांनी पुढे देशोदेशी आपले सांस्कृतिक संबंध तयार केले आणि जगातल्या अनेक देशांत 'घाशीराम' पोचवले. थिएटर अकॅडेमीचे आगाशे हे सांस्कृतिक दूतच बनले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील हा एक वेगळा पैलू. आगाशेंच्या कारकीर्दीतील पुढचे महत्त्वाचे पाऊल म्हणजे बर्लिन मधील 'ग्रिप्स थिएटर' त्यांनी मराठीतआणले. बालरंगभूमीकडे अभिनव दृष्टीने पाहणारी आणि अत्यंत वेगळ्या पद्ध्तीने मुलांची नाटके करणारी 'ग्रिप्स' ही नाट्य चळवळ. डॉ.आगाशेंनी या चळवळीतील अग्रगण्य दिग्दर्शक वुल्फ गाँग कोल्नेडर यांना भारतात आणले. काही जर्मन 'ग्रिप्स' नाटके मराठीतून सादर केली. पुढे इथल्या तरुण लेखक-दिग्दर्शकांनी ग्रिप्स शैलीची स्वतंत्र नाटके लिहिली व केली. डॉ. आगाशेंचा अभिनय प्रवास आजही दिमाखात सुरू आहे. 'काटकोन त्रिकोण' हे त्याचे सध्या सर्वांपुढे असलेले उत्तम उदाहरण. डॉ. मोहन आगाशे १९९७ ते एप्रिल २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. मा.सत्यजित रे यांनी एका कार्यक्रमात डॉ. मोहन आगाशे यांना 'भारतातील बुद्धिमान नट' म्हणून गौरविले होते. मोहन आगाशे हे बारामतीच्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष होते, आगाशे व्यवसायाने मानसशास्त्रज्ञ असून पुण्यातील भॉय जीजी भॉय वैद्यकीय महाविद्यालयात व ससून रुग्णालयात मानसशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम करतात. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले.
आपल्या समुहातर्फे मा. मोहन आगाशे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
No comments:
Post a Comment