स्टीव्ह डिटको
■ काही काल्पनिक व्यक्तिरेखाही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातात, त्यापैकी एक ‘स्पायडरमॅन’! कॉमिक बुकच्या- चित्रकथांच्या माध्यमातून स्पायडरमॅन जगात सर्वाच्या मनावर कोरला गेला. या व्यक्तिरेखेची निर्मिती करणाऱ्यांपैकी एक असलेले स्टीव्ह डिटको यांचे अलीकडेच निधन झाले. आबालवृद्धांच्या मनात ठसलेल्या या व्यक्तिरेखेची मूळ कल्पना स्टॅन ली यांची, पण त्या स्पायडरमॅनला सदेह रूप दिले ते डिटको यांनीच. त्याआधीही कॉमिक पुस्तकांमध्ये पात्रांचे तपशीलवार चित्रण करणारे कलाकार म्हणून डिटको यांची ओळख होती.
■ डिटको यांचा जन्म पेनसिल्वानियातील जॉन्सटाऊनचा. लहानपणापासूनच त्यांना कॉमिक्सची आवड होती. त्यांच्या काळात ‘बॅटमन’, ‘द स्पिरिट’ या कॉमिक्समुळे त्यांची घडण झाली. १९४५ मध्ये शाळा पूर्ण केल्यानंतर त्यांना लष्कराच्या वृत्तपत्रांसाठी कॉमिक स्ट्रिप्स काढण्याचे काम मिळाले. नंतर त्यांनी बॅटमनचे कलाकार जेरी रॉबिन्सन यांच्या हाताखाली न्यूयॉर्कमध्ये शिक्षण घेतले. त्यातूनच त्यांची ओळख ‘माव्र्हल कॉमिक्स’चे स्टॅन ली व कलाकार जॅक किर्बी यांच्याशी झाली. ‘माव्र्हल’मध्येच त्यांनी स्पायडरमॅन साकारला. १९६२ मध्ये ‘अमेझिंग फॅण्टसी’च्या अंकात स्पायडरमॅनची छबी पहिल्यांदा झळकली. त्यानंतर १९६३ मध्ये ‘माव्र्हल कॉमिक्स’ने ‘अमेझिंग स्पायडरमॅन’ ही स्वतंत्र मालिकाच आणली. स्पायडरमॅनने ३६० दशलक्ष पुस्तकांचा विक्रम केला आहे. त्यानंतर डिटको यांनी ‘डॉक्टर स्ट्रेंज’ हे पात्र निर्माण केले, पण तोवर ते ‘माव्र्हल कॉमिक्स’मधून वेगळे झाले होते. त्यानंतर त्यांनी स्क्विर्ल गर्ल, मिस्टर ए, कॅप्टन अॅटम या पात्रांची निर्मिती केली. ‘शार्लटन कॉमिक्स’साठी त्यांनी काही काळ काम केले व नंतर ‘माव्र्हल’चा प्रतिस्पर्धी असलेल्या ‘डीसी कॉमिक्स’मध्ये १९६८ मध्ये ते रुजू झाले. तिथे त्यांनी क्रीपरची निर्मिती केली. ती बॅटमनची छोटी खलनायकी आवृत्ती होती. २०१७ पर्यंत ती चित्रे ‘डीसी कंटिन्युइटी’मध्ये प्रसिद्ध होत होती.
■ डिटको यांचे आयुष्य अगदी बंदिस्त होते. त्यांनी कधी मुलाखती दिल्या नाहीत किंवा जाहीर कार्यक्रम घेतले नाहीत. अतिशय नम्र असे त्यांचे व्यक्तित्व. त्यांनी प्रत्येकाच्या मनात दडलेला नायक ‘स्पायडरमॅन’च्या रूपाने चित्ररूपात प्रकट केला. ‘माव्र्हल कॉमिक्स’ने जी सांस्कृतिक क्रांती केली त्याचे मूळ स्पायडरमॅनच होते. नंतर स्पायडरमॅनची हीच व्यक्तिरेखा- डिटको यांनी ठरवलेल्या अंगकाठी, चेहरामोहरा आणि वेशभूषेनुसारच- चित्रपट, टीव्ही शो अशी सगळीकडे वापरली गेली. डिटको यांचा समावेश नंतर १९९४ मध्ये ‘विल इसनर हॉल ऑफ फेम’मध्ये करण्यात आला. डिटको यांच्या निधनाने एक अनोखा कॉमिक्स कलाकार काळाच्या पडद्याआड गेला आहे
No comments:
Post a Comment