*
ताहिरा सफदर*
■ पाकिस्तानसारख्या
धर्मसत्ताक व पुराणमतवादी देशात एखाद्या महत्त्वाच्या पदावर महिलेची नेमणूक होणे
हे तसे अप्रूपच. तेथील कुठल्याच क्षेत्रामध्ये महिला फारशा आघाडीवर दिसत नाहीत.
असे असताना नुकतीच एका महिलेची नेमणूक चाकोरीबाहेर जाऊन करण्यात आली. तेथील
न्यायक्षेत्रात महिला तुलनेने कमीच, त्यातही
त्यांना उच्च पद मिळणे तर दूरच; अशा
परिस्थितीत पहिल्यांदाच बलुचिस्तान उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी ताहिरा
सफदर यांची नेमणूक करण्यात आली आहे.
■ पाकिस्तानातील
सर्वोच्च न्यायालयात किंवा उच्च न्यायालयात आतापर्यंत मुख्य न्यायाधीशपदी महिलेची
नेमणूक झाली
नव्हती, ती
ताहिरा यांच्या रूपात झाली आहे. एक तर ताहिरा यांच्यावर लाहोर उच्च न्यायालयाच्या
मुख्य न्यायाधीशांची नेमणूक करताना आधीच अन्याय झाला होता. त्याचे परिमार्जन काही
प्रमाणात या नेमणुकीने झाले आहे. तो केवळ एका व्यक्तीवरचा अन्याय नव्हता तर
महिलांवरचा अन्याय होता हे विसरता येत नाही. त्यामुळेच ताहिरा सफदर यांची नेमणूक
ही पाकिस्तानसारख्या इस्लामी देशात लिंगभाव समानतेच्या दिशेने अगदी छोटे पाऊल आहेच
हे विसरून चालता येणार नाही. ताहिरा यांचा जन्म क्वेट्टा येथे ५ ऑक्टोबर १९५७ रोजी
झाला. बलुचिस्तानात पहिल्या महिला न्यायाधीश म्हणून त्यांची १९८२ मध्ये नेमणूक
झाली. बलुचिस्तान विद्यापीठातून नंतर त्यांनी उर्दू साहित्यातून पदव्युत्तर पदवी व
१९८० मध्ये युनिव्हर्सिटी लॉ कॉलेजमधून कायद्याची पदवी घेतली. त्यांची वरिष्ठ
दिवाणी न्यायाधीश म्हणून १९८७ मध्ये नेमणूक झाली. नंतर १९९१ मध्ये अतिरिक्त जिल्हा
व सत्र न्यायाधीश हे पद त्यांच्याकडे आले. १९९८ मध्ये त्यांची बलुचिस्तान सेवा
लवादाच्या सदस्यपदी निवड, २००९
मध्ये याच लवादाचे अध्यक्षपद असा त्यांचा प्रवास प्रगतीकडे होत राहिला. नंतर
त्यांची नेमणूक २००९ मध्ये उच्च न्यायालयात अतिरिक्त न्यायाधीश म्हणून झाली व नंतर
२०११ मध्ये त्यांना या पदावर कायम करण्यात आले. अलीकडे त्या माजी अध्यक्ष परवेझ
मुशर्रफ यांच्या विरोधातील देशद्रोहाच्या खटल्यातील तीनसदस्यीय पीठाच्या सदस्या
होत्या. ३ नोव्हेंबर २००७ रोजी मुशर्रफ यांनी देशातील काही न्यायाधीशांना अटक करून
आणीबाणी जाहीर केली होती, त्याबाबतचा
हा खटला महत्त्वपूर्ण आहेच, शिवाय
त्यातील त्यांची नेमणूकही लक्ष वेधणारी अशीच. पाकिस्तानातील न्यायव्यवस्थेवर
आयएसआय व लष्कराचा सतत दबाव वाढला असताना ताहिरा यांचा मार्ग कंटकमय असला तरी
त्यांची नियुक्ती तेथील महिलांचे मनोबल वाढवणारी आहे यात शंका नाही.
No comments:
Post a Comment