आज २५ जुलै
आज आपल्या अफाट अष्टपैलू अभिनयाच्या गुणांवर कायमस्वरूपी ठसा उमटवलेला गंभीर प्रवृतीचे मा.निळू फुले यांची जयंती.
जन्म. २५ जुलै १९३१ पुणे.
निलकांत कृष्णाजी फुले उर्फ मा.निळूभाऊ सुरवातीच्या काळात वानवडीच्या लष्करी महाविद्यालयात माळीकाम करत असत. हे पिढीजात काम करताना त्यांना मनापासून आनंद मिळत होता. याच क्षेत्रात करिअर करायचा त्यांचा विचार होता. मात्र, आर्थिक अडचणीमुळं त्यांना नर्सरी उघडता आली नाही. तेव्हा मिळणाऱ्या ८० रुपये पगारातले दहा रुपये मा.निळूभाऊ राष्ट्रसेवा दलाला देत होते. १९५७ च्या सुमारास संयुक्त महाराष्ट्र लढ्याच्या वेळी निळूभाऊंनी सेवादलासाठी येऱ्यागबाळ्याचे काम नोहे हे नाटक लिहिलं. या नाटकामुळं मा. निळूभाऊंचे नाव झालं. मग त्यांनी माळीकाम सोडून पूर्णवेळ अभिनय क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतला. राम नगरकरांसोबत त्यांनी कथा अकलेच्या कांद्याची हे वगनाट्य गाजवलं. महाराष्ट्रभरात या दोघांचे नाव झालं. अनंत मानेंच्या एक गाव बारा भानगडी या तमाशापटात मा.निळूभाऊंना सिनेमातील पहिला ब्रेक मिळाला. या सिनेमात त्यांनी साकारलेल्या झेले अण्णांच्या भूमिकेनं त्यांना मराठी चित्रसृष्टीची कवाडं खुली झाली. पुढं १९७२ मध्ये मा.निळूभाऊंनी विजय तेंडुलकरांचं सखाराम बाइंडर या नाटकात काम केले आणि या नाटकानं इतिहास घडवला. त्यांना स्वतःलाही बाइंडर आणि दळवींच्या सूर्यास्तमधले अप्पाजी या भूमिका विशेष आवडायच्या. अप्पाजी ही भूमिका तात्त्विक दृष्ट्या त्यांच्या प्रत्यक्ष जीवनातील मूल्यांशी साधर्म्य सांगणारी होती, म्हणूनही असेल. बाइंडर नंतर तेंडुलकरांच्याच सामनामध्ये निळूभाऊंना हिंदूराव धोंडे पाटील साकारण्याची संधी मिळाली.शांतारामबापूंच्या पिंजरामुळं डॉ. श्रीराम लागूंचं मोठं नाव झालं होतं. सामनात निळूभाऊंचा सामना त्यांच्याशीच होता. प्रेक्षकांना मात्र या दोन नटश्रेष्ठांची जुगलबंदी पाहण्याचा अपूर्व योग लाभला. वास्तविक पिंजरात निळूभाऊ होतेच. त्यांची भूमिका छोटी होती. मात्र, मास्तरांकडं पाहून केवळ कुत्सितपणे हसणं एवढीच कामगिरी त्यांनी अशी जबरदस्त साकारली होती, की हे केवळ निळूभाऊच करू जाणे. मास्तर म्हणजे डॉ. लागू संतापून एकदा निळूभाऊंच्या जोरात मुस्कटात भडकावतात, हा प्रसंग म्हणजे त्या चित्रपटातील एक हायपॉइंट ठरला होता. निळूभाऊंच्या अभिनय सामर्थ्याची प्रचिती डॉ. लागूंना तेव्हाच आली होती. त्यामुळं सामना करताना दोघांनाही मजा आली. हिंदूरावची भूमिका निळूभाऊ अक्षरशः जगले. तेव्हा महाराष्ट्रात सहकार क्षेत्रातून ग्रामीण भागात होत असलेले बदल आणि या साखरसम्राटांकडून सुरू झालेला सत्तेचा गैरवापर हा मुद्दा प्रभावी होता. तेंडुलकरांनी हिंदूरावची भूमिका जबरदस्त लिहिली होती. या भूमिकेला निळूभाऊंनी पुन्हा एकदा समर्थपणे न्याय दिला. सामना चित्रपटानंतर निळूभाऊंकडं अशाच पद्धतीच्या भूमिकांची रांग लागली. सगळेच चित्रपट काही एवढे दर्जेदार नसायचे. निळूभाऊंचाही पोटापाण्याचा व्यवसाय असल्यानं येतील त्या भूमिका कराव्या लागायच्या. बहुतेक वेळा टिपिकल खलनायक रंगवावा लागे. त्यात मग नायिकेच्या पदराला हात घालण्याचा प्रसंग अनेक वेळा यायचा. एरवी अत्यंत सच्छिल असलेल्या निळूभाऊंना वारंवार नायिकेवर बलात्कार करण्याचा सीन शूट करावा लागायचा. मराठी सिनेमांतल्या नायिकाही त्याच त्या असायच्या. कोल्हापुरातल्या मुक्कामात शेवटी ते वैतागून दिग्दर्शकाला म्हणाले, अरे, गेल्या तीन सिनेमांत मी तेच करतोय आणि बाईही तीच. निदान या खेपेला बाई तरी बदला... एक किस्सा सांगतात की एका मराठी कलाकाराने निळूभाऊंना घरी जेवायला बोलावलं होतं. त्या वेळी त्या कलावंताच्या आईनं, असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही, असं म्हणून त्यांना जेवणही नाकारलं होतं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती. त्यांच्या या नेहमीच्या पठडीतून बाहेर काढून, त्यांना एकदम प्रोटॅगनिस्टची भूमिका देण्यासाठी पुन्हा जब्बार पटेल धावून आले. अरुण साधूंच्या मुंबई दिनांक आणि सिंहासन या दोन कादंबऱ्यांवर आधारित सिंहासन या चित्रपटात दिगू टिपणीस या पत्रकाराची भूमिका मा.निळूभाऊंच्या वाट्याला आली. सत्ताकेंद्राच्या अत्यंत जवळ राहून, सिंहासनाचा सर्व खेळ तटस्थपणे पाहणाऱ्या दिगूची भूमिका मा.निळूभाऊंनी समरसून केली. या चित्रपटाचा शेवट मंत्रालयाच्या बाहेर खदाखदा हसत सुटलेल्या दिगूवर होतो. मा.निळूभाऊंनी त्या हसण्यात त्या व्यवस्थेविषयीची सर्व प्रतिक्रिया एवढी टोकदारपणे व्यक्त केली होती, की तो चेहरा आजही डोळ्यांसमोरून हलत नाही. जब्बार पटेलांच्या बहुतेक सिनेमांत मा.निळू फुले असायचेच. मग तो जैत रे जैत असो, की एक होता विदूषक असो. मा.निळू फुले यांनी थोडे-फार हिंदी सिनेमेही केले. 'कुली'मध्ये ते अमिताभसमोर तेवढ्याच ताकदीनं उभे राहिले. महेश भटच्या 'सारांश'मध्येही त्यांना खलनायक साकारायला मिळाला. पण मा.निळू फुले हिंदीत फार रमले नाहीत. त्यांना आपल्या गावरान मराठी सिनेमांचा ठसकाच अधिक भावत असावा.
मा.निळू फुले यांच्या व्यक्तित्वाचा आणखी एक विशेष म्हणजे ते निव्वळ अभिनेते नव्हते. त्याहीपलीकडं जाणारी,खऱ्या आयुष्यातली माणूस नावाची एक वास्तववादी भूमिका ते अगदी समरसून जगत होते. महात्मा फुल्यांचा वारसा सांगणारे एक सामाजिक अंग निळूभाऊंना होते. सर्वसामान्य, गोरगरीब जनतेविषयी त्यांना कळवळा होता. शबनम, झब्बा अशा साध्या वेषात एरवी ते तसेही कार्यकर्ताच वाटत. राष्ट्रसेवा दल, डॉ राममनोहर लोहिया यांच्या विचारांची बांधिलकी त्यांनी आयुष्यभर जपली. सामाजिक कृतज्ञता निधी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा विविध उपक्रमांना, संघटनांना त्यांचा सक्रिय पाठिंबा असे. मा.निळू फुले यांना अनेक पुरस्कार मिळाले त्यात महाराष्ट्र शासनातर्फे अभिनयासाठी सलग ३ वर्षे साहित्य संगीत अकादमीचा पुरस्कार, 'सूर्यास्त' या नाटकाकरिता नाट्यदर्पण हा पुरस्कार,जयंतराव टिळक जीवनगौरव पुरस्कार यांचा समावेश आहे. मा.निळू फुले यांचे १३ जुलै २००९ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.निळू फुले यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
मा.निळू फुले यांची कारकीर्द.
गाजलेली लोकनाट्ये
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.
गाजलेले मराठी चित्रपट
अजब तुझे सरकार, आई (नवीन), आई उदे गं अंबाबाई, आघात, आयत्या बिळावर नागोबा, एक गाव बारा भानगडी, एक रात्र मंतरलेली, एक होता विदुषक, कडकलक्ष्मी, कळत नकळत, गणानं घुंगरू हरवलं, गल्ली ते दिल्ली, चटक चांदणी, चांडाळ चौकडी, चोरीचा मामला, जगावेगळी प्रेमकहाणी, जन्मठेप, जिद्द, जैत रे जैत, दिसतं तसं नसतं, दीड शहाणे, धरतीची लेकरं, नणंद भावजय, नाव मोठं लक्षण खोटं, पटली रे पटली, पदराच्या सावलीत, पायगुण, पिंजरा, पुत्रवती, पैज, पैजेचा विडा, प्रतिकार, फटाकडी, बन्याबापू, बायको असावी अशी, बिन कामाचा नवरा, भन्नाट भानू, भालू, भिंगरी, भुजंग, मानसा परीस मेंढरं बरी, मालमसाला, मुक्काम पोस्ट ढेबेवाडी, राघुमैना, राणीने डाव जिंकला, रानपाखरं, रावसाहेब, रिक्षावाली, लाखात अशी देखणी, लाथ मारीन तिथं पाणी, वरात, शापित, सतीची पुण्याई, सर्वसाक्षी, सवत, सहकारसम्राट, सामना, सासुरवाशीण, सोबती, सोयरीक, सिंहासन, सेनानी साने गुरूजी, सोंगाड्या, हर्या नार्या जिंदाबाद, हळदी कुंकू, हीच खरी दौलत.
गाजलेले हिंदी चित्रपट
कूली, जरा सी जिंदगी, दिशा, दुनिया, नरम गरम, प्रेम प्रतिज्ञा, मशाल, सारांश, सौ दिन सास के
गाजलेली नाटकं
जंगली कबूतर, बेबी, रण दोघांचे, सखाराम बाईंडर, सूर्यास्त.
संजीव वेलणकर पुणे.
No comments:
Post a Comment