आज २५ जुलै
आज ज्येष्ठ संगीतकार-गायक मा.सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांची जयंती.
जन्म. २५ जुलै १९१९ कोल्हापूर येथे.
मा.बाबूजी यांचे मूळ देवगडच्या भूमीत आहे यावर नव्या पिढीचा विश्वासच बसत नाही, पण ते पूर्णसत्य आहे. आजही त्यांचे घर वाडा-फणसे या गावात अस्तित्वात आहे. त्यांचे आजोबा फणसे येथून कोल्हापूरला गेल्यावर तेथेच स्थानिक झाले. बाबूजींचे वडील विनायक हे निष्णात वकील म्हणून प्रसिद्ध असल्याने त्यांना कोल्हापूरचे टिळक म्हणून ओळखले जायचे. गायन आणि वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांनी पं. वामनराव पाध्ये यांच्याकडून घेतले. त्यांच्या वडिलांच्या अचानक निधनाने त्यांना संगीताचे शिक्षण मध्येच सोडून पोटापाण्याच्या व्यवसायात लक्ष घालावे लागले. कोल्हापूर सोडून मुंबईत आणि नंतर उत्तर भारतात दोन वर्षे दौरा करून त्यांनी मैफलींमध्ये सादरीकरण केले. यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रांतातील लोकसंगीताचा व कलांचा जवळून अभ्यास करता आला. त्याचा वापर बाबूजींनी आपले संगीत खुलविण्यासाठी केला. त्यामुळे अल्पावधीतच त्यांची एक नावाजलेला गायक व संगीतकार म्हणून ओळख झाली. एचएमव्ही सोबत १९४१ मध्ये त्यांनी आपल्या चित्रपट कारकीर्दीची सुरुवात केली. ‘जगाच्या पाठीवर’ या चित्रपटातील गीते त्या काळात खूपच गाजल्याने मा.सुधीर फडके यांना खूप प्रसिद्धी मिळाली. स्वत: गायक, गीतकार असल्याने पुढे प्रभात चित्रपट संस्थेच्या माध्यमातून १९४६ मध्ये ते संगीतकार म्हणून उदयास आले. जुन्या पिढीतील पार्श्वगायिका ललिता देऊळकर यांच्याशी २९ मे १९४९ ला त्यांचा विवाह झाला. पुणे येथे संपन्न झालेल्या विवाहात त्यांनी स्वत:च्या लग्नात मंगलाष्टके म्हटल्याचे सांगितले जाते. कवी न. ना. देशपांडे यांनी रामचंद्र हे नाव बदलून ‘सुधीर’ असे नामकरण केले. मा.सुधीर फडके यांनी सुमारे ११० चित्रपटांना तर सुमारे २० हिंदी चित्रपटांना संगीत दिले. याशिवाय अनेक भावगीते, भक्तिगीते आणि मराठी लावण्यांना त्यांनी आपल्या मधुर संगीताने सजविले आहे. बाल गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, माणिक वर्मा, लता मंगेशकर, आशा भोसले, मोहम्मद रफी आणि मन्नाडे अशा अनेक दिग्गज गायकांच्या स्वरांना त्यांनी आपल्या संगीताच्या कोंदणात बसविले आहे. गायक-संगीतकार म्हणून प्रसिद्ध असलेले मा.सुधीर फडके यांच्यात एक चांगला अभिनेताही दडलेला होता. त्यांचे सुहासिनी, आम्ही जातो आमच्या गावा, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर हे चित्रपट प्रचंड यशस्वीह ठरले होते. हिंदी चित्रपटातील भाभी की चूडिया या चित्रपटाचे 'ज्योती कलश छलके' हे पहाटगाणं आजही रसिकमनाचा ठाव घेते. पहली तारीख’ या चित्रपटातील किशोरकुमार यांनी गायलेले 'खुश है जमाना आज पहली तारीख है' हे गीत रेडियो सिलोनवरून आजही पहिल्या तारखेला वाजत आहे. संगीतकार खय्यामही त्यांच्या संगीताच्या मधुरतेने प्रभावित झाले होते. पण महाराष्ट्राच्या घराघरात मा.बाबूजी जाऊन पोचले ते 'गदिमां'च्या गीत रामायणामुळे. या रामायणातील ५६ गीतांसाठी त्यांनी दिलेले संगीत आणि केलेले गायन एक वेगळाच प्रयोग आहे. त्यांनी गीत-रामायणाचे देश-विदेशात १८०० हून अधिक कार्यक्रम केले. आकाशवाणीवर सर्वाधिक लोकप्रियता मिळविलेला हा एक वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम त्या काळी ठरला होता. चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले होते. स्वातंत्र्यलढ्यातील थोर सेनानी तात्याराव तथा विनायक दामोदर सावरकर यांच्यावरचा ‘वीर सावरकर’ चित्रपट बनविण्यासाठी त्यांनी कूपन्स विकून आणि कार्यक्रम करून निधी गोळा केला होता. त्यांनी दिलेल्या संगीत सेवांसाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यात स्वामी हरिदास सन्मान, सूरसिंगार सांसद पुरस्कार, जीवनगौरव पुरस्कार, लता मंगेशकर पुरस्कारांचा समावेश आहे. अमेरिकेतील ‘इंडिया हेरीटेज फाऊंडेशनचे ते संस्थापक सदस्य होते. ‘हा माझा मार्ग एकला’ या सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचे राष्ट्रीय पारितोषिक १९६३ मध्ये पं. नेहरूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते त्यांनी स्वीकारले. तर १९९१ साली राष्ट्रपती वेंकटरमण यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय ‘मा. दिनानाथ संगीत पुरस्कार’ व राज्यशासनाचा ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ व ‘सह्याद्री स्वररत्न पुरस्कार’ त्यांना लाभले. मा.सुधीर फडके यांचे २९ जुलै २००२ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.सुधीर फडके यांना आदरांजली.
संजीव वेलणकर पुणे.
No comments:
Post a Comment