Definition List

LightBlog
Viral Gawali

Wednesday, July 25, 2018

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.



खिशात भरपूर पैसा असल्यावर आपण आनंदी असण्याची काहीही शाश्वती नसते पण जवळ पुरेसा पैसा नसला की दुःख ग्यारंटेड असतं!! याची उप-गंमत म्हणजे ‘पुरेसा’ म्हणजे काय हे आयुष्यात कधीही समजत नाही… उप-उप-गंमत अशीये की पुरेसा म्हणजे किती हे ठरवलं आणि तेवढा मिळवलाच तरी तो ‘पुरत’ नाही आणि पुरेसाची व्याख्या पुन्हा बदलते!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
आपल्याला आपल्या शिक्षण, लायकी आणि कष्टांच्या मानानी कमीच मिळतो आहे असं वाटत असतं. आपल्यापेक्षा कमी शिक्षण किंवा लायकी असलेल्या आणि नगण्य कष्ट करणाऱ्यांना खूप जास्त मिळतोय असं वाटत असतं. आपल्याला जो मिळतो तो टिकत नाही, इतरांकडे मात्र टिकतो असं वाटत असतं. आपल्याला बेसिक गरजांनाही पुरत नाही, इतरांकडे अफाट उधळपट्टी करायला असतो असं वाटत असतं. आणि हे असं म्हणजे असंच सगळ्या सगळ्यांनाच वाटत असतं! इतरांच्या तूलनेत आपला पैसा ही फार म्हणजे फार गंमतशीर गोष्ट आहे!!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
तो एका दरवाज्यानं येतो आणि हजार खिडक्यांवाटे पसार होतो! आला की खूप छान, भारी, मस्त, बरं वगैरे वाटतं. पण तो नुसताच येऊन थांबल्यानं आणि घरात साचून राहिल्यानं त्यातून काही म्हणजे काही मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे खूप पैसा आलाय हे भारी वाटलं तरी त्यानं पोटही भरत नाही आणि इतर सुखंही मिळत नाहीत. पोट भरायचं आणि इतर काही मिळवायचं तर त्याला अनंत खिडक्यांमधून बाहेरच जाऊ द्यावं लागतं. पैसा आल्यामुळे मिळणारं सुख मोठं? कि खर्चल्यामुळे मिळणारं? हे ठरवता येत नाही, कारण पैसा अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
‘दैव देतं आणि कर्म नेतं’ ही म्हण पैशाला लागू होत नाही. पैसा कष्ट केल्यानं, म्हणजे ‘कर्मानं’च मिळतो. क्वचित कधी दैवामुळंही मिळू शकतो, लॉटरी वगैरे लागल्यावर, पण तो काही शाश्वत मार्ग नाही. रेग्युरल, नियमित वगैरे पैसा मिळवायचा तर अफाट कष्ट पडतात, ‘कर्म’ करावं लागतं. पण ‘कर्मानं’ मिळालेला पैसा ‘दैवा’मुळे एका क्षणात नाहीसा होऊ शकतो. चोरी म्हणू नका, टॅक्स म्हणू नका, आजारपणं म्हणू नका, अपघात म्हणू नका, भूकंप म्हणू नका… काय वाट्टेल ते ‘दैव’ किंवा योगायोग समोर उभे ठाकतात आणि कर्मानं कमावलेल्या पैशाचं क्षणार्धात होत्याचं नव्हतं होऊ शकतं… ‘कर्म कमावतं अन दैव हिसकावतं’ ही पैशाच्या बाबतीतली म्हण असायला हवी!!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
दुसऱ्याकडून उधार घेतलेला पैसा कधीच लक्षात रहात नाही आणि दुसऱ्याला उधार दिलेला पैसा कधीच विसरला जात नाही!! जे उधारीचं तेच मदतीचं, तेच दान-धर्माचं, तेच खर्चाचं वगैरे. आपल्याला मिळालेलंही आपलंच आणि आपण दिलेलंही आपलंच हे फक्त पैशाच्या बाबतीत घडतं, कारण पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे!!

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
ज्याच्याकडे नाही त्याला कमवावासा वाटतो. ज्याच्याकडे आहे त्याला अफाट कमावावासा वाटतो आणि ज्याच्याकडे अफाट आहे त्यालाही अजून जास्त अफाट कमवावासा वाटतो. माझ्याकडे आहे तेवढा पुरेसा आहे, मला अजून जास्त पैसा नको असं कोणी म्हणजे कोणी म्हणत नाही.

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे.
‘पैशापाशी पैसा जातो!’ जिथे ऑलरेडी खूप पैसा आहे तिथे अजून अजून पैसा जात रहातो. जिथे खूप कमी पैसा आहे तिथून पैसा जमेल तेवढ्या लवकर कल्टी मारत रहातो.

पैसा ही अत्यंत गंमतशीर गोष्ट आहे. पैसा मिळवण्यासाठी आयुष्यभर आपण खपतो. मग एक दिवस आपण ‘खपल्यावर', आपण निघून जातो, पैसा इथेच रहातो!!!
पैसा 🌺पैसा 🌸पैसा🌷👍

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers