आज २२ जुलै
आज महान पार्श्वगायक मा.मुकेश यांची जयंती.
जन्म. २२ जुलै १९२३
मा.मुकेश यांचे संपूर्ण नाव मुकेश चंद माथुर असे होते. दिल्लीतील दरियागंज आणि चांदनी चौकात त्यांचे बालपण गेले. दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी लोक कल्याण विभागात पी डब्ल्यू डी त नोकरी करायला सुरुवात केली होती. मा.मुकेश यांना बालपणापासूनच संगीताची आवड होती. त्यांनी नोकरीबरोबरच गायनालाही सुरुवात केली. ते गायक-अभिनेता कुंदनलाल सहगल यांचे मोठे प्रशंसक होते आणि त्यांच्याप्रमाणेच गायक अभिनेता बनण्याचे त्यांचे स्वप्न होते.संगीताचे, गायकीचे बाळकडू त्यांना लहानपणीच मिळाले. या हि-याला ओळखले ते मोतीलाल यांनी. मोतीलाल हे त्या काळचे बडे प्रस्थ. मा.मुकेश यांचे दूरचे नातेवाईक. मा.मुकेश यांच्या बहिणीच्या लग्नात त्यांनी मा.मुकेश यांचे गाणे ऐकले. मोतीलाल त्या आवाजाने प्रभावित झाले. त्यांनी मा.मुकेश यांना मुंबईत आणले. पं. जगन्नाथ प्रसाद यांच्याकडे मा.मुकेश यांची तालीम सुरू झाली. याच काळात मा.मुकेश यांनी ‘निर्दोष’मध्ये नायकाची भूमिका वठवली. ‘निर्दोष’ सिनेमा गाजला नाही. गायक म्हणून मा.मुकेश यांचा पहिला चित्रपट ‘पहली नजर’ होता. अनिल विश्वास या चित्रपटाचे संगीतकार होते. यातील ‘दिल जलता है’ हे मोतीलाल यांच्यावर चित्रित झालेले गाणे बरेच गाजले. या गाण्यावर कुंदनलाल सैगल यांच्या शैलीचा प्रभाव होता. १९५८ मध्ये 'यहुदी' या चित्रपटातल्या 'ये मेरा दीवानापन है' या प्रसिद्ध गाण्याने त्यांना गायक म्हणून नाव मिळवून दिले. सैगलच्या प्रभावातून मा.मुकेश लवकरच बाहेर आले आणि जन्माला आली मा.मुकेश यांच्या अनुनासिक शैलीतील अविस्मरणीय गाणी!
नौशाद यांच्या संगीताने नटलेल्या ‘मेला’ आणि ‘अंदाज’मधून स्वतंत्र मा.मुकेश शैली सुरू झाली. ‘अंदाज’ या प्रेमाच्या त्रिकोणावर आधारित चित्रपटातील मा.मुकेश यांच्या ‘सोलो’ गाण्यांनी कहरच केला. या चित्रपटात मा.मुकेश यांनी दिलीपकुमार यांच्यासाठी गायलेली ‘तू कहे अगर’, ‘हम आज कहीं दिल खो बैठे’, ‘झूम के नाचो आज’ आणि ‘टूटे ना दिल टूटे ना’ ही चारही गाणी सुपरहिट ठरली. कालांतराने राज कपूर यांचा ‘आवाज’ बनलेल्या मा.मुकेश यांची ही गाणी पडद्यावर दिलीपकुमार यांच्या तोंडी होती, हे विशेष! ‘अंदाज’च्या यशानंतर मा.मुकेश यांनी मागे वळून पाहिले नाही. रणजीत स्टुडिओ’च्या एका खोलीत ते असेच गात बसलेले असताना एक देखणा तरुण तिथे आला आणि म्हणाला, ‘‘किती भावनाप्रधान आहे तुझे गायन; मला खूप आवडले.’’ त्या तरुणाचे नाव होते राज कपूर. मा.मुकेश आणि राज कपूर यांचे समीकरण पुढे आयुष्यभर जुळले. १९४८ साली आलेल्या ‘आग’मध्ये राज कपूर यांच्यासाठी मा.मुकेश यांनी पार्श्वगायन केले. येथूनच मग राज कपूर-मा.मुकेश हे समीकरण जुळले आणि उदयास आली अवीट गोडीची श्रवणीय गाणी! आग, आवारा, श्री ४२०, बरसात, परवरिश, अनाडी, संगम ते मेरा नाम जोकर असे मा.मुकेश यांच्या सदाबहार गाण्यांनील नटलेले ‘आरके’ कॅम्पमधले चित्रपट म्हणजे कानसेनांना मेजवानीच ठरली.
मा.मुकेश हे तसे रागदारीत तरबेज असलेले गायक म्हणून प्रसिद्ध नव्हते. परंतु आपल्या गाण्यात भावना ओतून ते गात असत. आणि त्यामुळे त्यांचे गाणे चित्ताचा ठाव घेत असे. १९५९ साली ‘अनाडी’ सिनेमासाठी त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड देण्यात आला होता. रजनीगंधा मधील गाणे कई बार यू हीं देखा साठी मुकेश यांना राष्ट्रिय पुरस्कार मिळाला. मा.मुकेश यांचे २७ ऑगस्ट १९७६ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा.मुकेश यांना आदरांजली.
No comments:
Post a Comment