Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

मराठीतले एक यशस्वी दिग्दर्शक मा. राजा ठाकूर यांची पुण्यतिथी

मराठीतले एक यशस्वी दिग्दर्शक मा. राजा ठाकूर यांची पुण्यतिथी
जन्म:- २६ नोव्हेंबर १९२३
दोन-तीन चित्रपटात राजा ठाकूरांनी जुन्नरकरांबरोबर संकलनात सहाय्यक म्हणून काम केले. १९४७ साली संगीतकार शंकरराव पवार यांना जी. एम. शहा नावाचा निर्माता भेटला. त्याला चित्रपट काढायचा होता. शंकररावांनी त्याला राजाभाऊ परांजपे यांचं नाव दिग्दर्शक म्हणून सुचवलं. राजाभाऊंनी राजा ठाकूरचं संकलनाचं काम पाहिलं होतं. व राजा ठाकूर यांच्यावर संकलनाची जबाबदारी सोपवली. चित्रपटाचं नाव होतं ‘बलिदान. १९४७ च्या ‘बलिदान’ पासून ते १९५३ पर्यंत सुमारे १५ चित्रपटांचं संकलन राजानं केलं आणि मराठी चित्रपटसृष्टीत एक उत्तम संकलक म्हणून नाव मिळवलं. संकलक राजा ठाकूर हे दिग्दर्शक राजाभाऊ परांजपे यांचे घनिष्ठ सहकारी होते. छायाचित्रकार बाळ बापट आणि संकलक राजा टाकूर हे राजाभाऊ परांजप्यांचे डावे-उजवे हात होते. राजा ठाकुरांनी संकलक म्हणून नाव कमावलं. परंतु त्यांच्या मनात एक ‘प्रतिभावंत’ कल्पक दिग्दर्शक दडला होता. १९५३ सालच्या ‘बोलविता धनी’ या चित्रपटापासून राजा ठाकूर यांची दिग्दर्शक म्हणून कारकीर्द सुरु झाली. १९५३ ते १९७५ या २३ वर्षांत त्यांनी २० मराठी, २ हिंदी व ‘बिरबल ब्रदर’ या इंग्रजी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. दिग्दर्शक म्हणून राजा ठाकूरांची अनेक वैशिष्ठ्ये होती. उत्तम साहित्यिकांकडून त्यांनी पटकथा-संवाद लिहून घेतले. त्यात ग. दि. माडगूळकर, ग. रा. कामत, मधुसूदन कालेलकर, शं. ना. नवरे, राम केळकर, पु. भा. भावे, सुरेश खरे, रणजित देसाई अशी मंडळी होती. यातील शं. ना. नवरे, पु. भा. भावे, सुरेश खरे, राम केळकर व रणजित देसाई यांना त्यांनीच आग्रह करून पटकथा-संवाद लेखक बनवले. ठाकुरांच्या चित्रपटांचे मूळ कथा लेखक दत्त रघुनाथ कवठेकर, अरविंद गोखले, चिं. वि. जोशी, पं. महादेव शास्त्री जोशी, द. ग. गोडसे, बाबुराव अर्नाळकर, वसुंधरा पटवर्धन, व. पु. काळे, ग. वा. बेहेरे असे ख्यातकीर्त साहित्यिक होते. मराठी चित्रपटसृष्टीत त्याकाळी तमाशा, लावणी, पाटील व कुर्हाटड यांचा वापर करणार्या ग्रामीण चित्रपटांची चलती होती. पण राजा ठाकूर त्या वाटेला गेले नाहीत. त्यांच्या चित्रपटांपैकी ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ आणि ‘रंगल्या रात्री अशा’ या दोन्ही चित्रपटांचं कथानक जरी तमाशाप्रधान असलं तरी तिथे चाळांचा किंवा लावण्यांचा उपयोग गल्ल्यासाठी केला नव्हता. राजा ठाकुरांनी सामाजिक चित्रपट दिले. पण त्याबरोबर ‘गजगौरी’सारखा पौराणिक, ‘राजगडचा राजबंदी’सारखा ऐतिहासिक, ‘गोरा कुंभार’सारखा संतपट आणि ‘मी तुळस तुझ्या अंगणी’ व ‘रंगल्या रात्री अशा’सारखे थोडा तमाशा दाखवणारे चित्रपट दिले. ‘बिरबल माय ब्रदर’ सारखा इंग्रजी चित्रपट दिग्दर्शित करणारे ते पहिले मराठी दिग्दर्शक होते. याच चित्रपटानं त्यांना हिंदी चित्रपटसृष्टीचं दार खुलं केलं. ‘जखमी’ने अनेक ठिकाणी रौप्यमहोत्सव साजरा केला. ‘जखमी’नंतर ‘रईसजादा’ हा हिंदी चित्रपट राजा ठाकुरांनी करायला घेतला. हा चित्रपट त्यांच्या हयातीत पुरा होऊ शकला नाही. राजा ठाकूर यांना महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवात सहा वेळा उत्कृष्ट चित्रपटाचा व सहा वेळा उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला. त्यांच्या तंत्रज्ञालाही अनेक पुरस्कार मिळाले. ‘मी तुळस तुझ्या अंगणी’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एकटी’ व ‘मुंबईचा जावई’ या चार चित्रपटांना राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले. शांत स्वभावाचे राजा ठाकूर साहित्यिक, कलावंत नट, यांच्यात रमत. त्यांचा सुसंस्कृतपणा बोलण्यात व आचरणातून दिसत असे. मा.राजा ठाकूर यांचे २८ जुलै १९७५ रोजी निधन झाले.* आपल्या समुहा तर्फे मा.राजा ठाकूर यांना आदरांजली.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers