Definition List

LightBlog
Viral Gawali

Friday, July 27, 2018

सर्गियो मार्कियोनी

सर्गियो मार्कियोनी


■  आजवर जगातल्या फार थोडय़ा मोटार कंपन्या तोटा आणि कर्जाच्या गर्तेत सापडल्यानंतर त्यातून सहीसलामत बाहेर पडू शकल्या. पुन्हा असे कर्ज काही हजार कोटींच्या घरात असल्यास या कंपन्या पुन्हा स्थिरस्थावर होणे म्हणजे एक चमत्कारच ठरतो. अशी अद्भुत घटना काही वर्षांपूर्वी आधी फियाट आणि नंतर क्रायस्लर कंपनीच्या बाबतीत घडली. ती दोनदा साध्य करून दाखवली सर्गियो मार्कियोनी यांनी. फियाट-क्रायस्लर कंपनीचे हे माजी सीईओ नुकतेच निवर्तले.

■  २००४ मध्ये त्यांनी प्रथम फियाट कंपनीचे मुख्य कार्यकारी पद स्वीकारले. इटलीतील प्रतिष्ठित अग्नेली कुटुंबाबाहेर प्रथमच एखाद्याला अशी संधी मिळत होती. मार्कियोनी यांनी अल्पावधीतच फियाट कंपनीला तोटय़ाच्या फेऱ्यातून बाहेर काढले. फियाट- ५०० या चिमुकल्या मोटारीला त्यांनी नव्याने बाजारात आणले. फियाट कंपनीसाठी ती अत्यंत लाभदायी खेळी ठरली. २००८ मध्ये मंदीसदृश परिस्थितीमुळे अमेरिकेतली क्रायस्लर मोटार कंपनी डबघाईला आली. काही वर्षांपूर्वी झालेले डायमलर बेन्झ कंपनीबरोबर क्रायस्लरचे विलीनीकरण अपयशी ठरू लागले होते. त्यांनी फियाटला मदतीसाठी पुकारले. त्यातून बनलेल्या फियाट-क्रायस्लर कंपनीची जबाबदारीही मार्कियोनी यांच्याकडे आली. क्रायस्लर कंपनीचे कर्मचारी भेदरले होते. मार्कियोनी यांनी त्यांना पहिल्याच भेटीत आश्वस्त केले. मी तुम्हाला पाहतो आहे आणि माझ्यासाठी तुम्ही महत्त्वाचे आहात, हे त्यांचे शब्द लाखमोलाचे ठरले. फियाटप्रमाणेच क्रायस्लरलाही नवी ऊर्जा मिळाली. मार्कियोनी यांचे नेतृत्व आणि मोक्याच्या पदांवर (लीडरशिप टीम) योग्य माणसे नेमण्याची त्यांची क्षमता फियाट-क्रायस्लरला नव्या वाटेवर घेऊन गेली. ते साच्यातले सीईओ नव्हते. कधीही सुटात वावरले नाहीत. काळा स्वेटर घालूनच कंपनीत यायचे किंवा कॉन्फरन्सला उपस्थित राहायचे. आपल्या कंपनीच्या मोटारींची परखड चिकित्सा जाहीरपणे करायचे. काही वेळा टीकाही करायचे. उगीच आपल्या कंपनीने कशी जगावेगळी मोटार बनवली आहे वगैरे अभिनिवेश नाही. कर्मचाऱ्यांशी बोलायचे. इलेक्ट्रिक मोटारींचे सार्वत्रिक गुणगान सुरू असताना, असल्या मोटारी बनवायला महाग असतात आणि त्यांना अजूनही निश्चित, शाश्वत अशी बाजारपेठ नाही हे त्यांनीच पहिल्यांदा बोलून दाखवले. मार्कियोनी यांना भारताविषयी प्रेम आणि रतन टाटांविषयी नितान्त आदर होता. फियाट कंपनीने टाटांच्या सहकार्याने भारतात बस्तान मांडण्याचा प्रयत्न केला. मार्कियोनी आणि रतन टाटा या मैत्रीचे शिल्पकार होते. ही मोहीम फसली पण मैत्री टिकली. प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास हे टाटांचे गुण अनुकरणीय आहेत. राष्ट्रउभारणीप्रति टाटांची निष्ठा तर वंदनीय आहे, असे मार्कियोनी नेहमी सांगत. फियाट कंपनीचे उत्कृष्ट इंजिन उपलब्ध असतानाही टाटांनी देशी बनावटीचे इंजिन विकसित केले नि यशस्वीरीत्या वापरून दाखवले याचे मार्कियोनी यांना विलक्षण कौतुक वाटे. त्यांनी  सतत नवीन उपायांचा, धोरणांचा विचार केला. डोळे नि कान उघडे ठेवावेत आणि चुका सुधारता येत नसतील तर किमान स्वीकारण्याचा मोठेपणा दाखवावा हा त्यांचा जीवनविषयक सोपा, सरळ सिद्धान्त होता.

No comments:

Post a Comment

Translate

Search This Blog

Followers