🏙 मलकापूर 🏙
महाराष्ट्र राज्याच्या बुलढाणा जिल्ह्यातील याच नावाच्या तालुक्याचे प्रमुख ठिकाण व व्यापारकेंद्र. लोकसंख्या 43,123 (1981). हे बुलढाण्याच्या उत्तरेस 45 कि.मी. मध्य रेल्वेच्या मुंबई - नागपूर या लोहमार्गावरील महत्वाचे स्थानक असून नळगंगा नदीकाठी वसले आहे.
रस्ते व लोहमार्ग यांच्या सुविधांमुळे येथे व्यापारीची वाढ झाली आहे.
खानदेशातील प्रसिद्ध फारूकी वंशातील राजाने हे शहर वसविले व आपल्या मलिका या राजकन्येचे नाव या शहराला दिले असे म्हटले जाते तथापि याबाबत लेखी पुरावा उपलब्ध नाही.
नरनाळा सरकारच्या परगण्याची राजधानी येथे असल्याचा उल्लेख आईन-ई-अकबरीमध्ये आढळतो. शहराच्या जुन्या व भग्न तटबंदीमधील पाच दरवाज्यांपैकी एका दरवाजावरील शिलालेखात ही तटबंदी 1729 मध्ये मुहंमद मलिकखानाच्या कारकीर्दीत बांधल्याचा उल्लेख मिळतो.
मलकापूर निजामाच्या अंमलाखाली असताना त्याने तेथे 20,000 सैन्य ठेवले होते. दुसऱ्या इंग्रज - मराठे युद्धापूर्वी 1803 मध्ये दौलतराव शिंदे व रघूजी भोसले यांचा येथे तळ असल्याचा उल्लेख मिळतो. एकोणिसाव्या शतकारंभापासून ब्रिटिश अंमलापर्यंत (1853) मलकापूर हे तालुकदार, जमीनदार, राजपूत, मुसलमान यांच्यामधील अनेक लढायांचे केंद्र बनले होते.
शहरात कापसाची सरकी काढण्याचे व गाठी बांधण्याचे कारखाने, यंत्रमाग, तेलघाण्या असून कापूस, ज्वारी, मिरची व गुरे यांची ही मोठी बाजारपेठ आहे. 1906 पासून येथे नगरपालिका असून येथील जामा व नगीना या मशिदी उल्लेखनीय आहेत.
राम, दत्तात्रेय यांची मंदिरे तसेच 1952 मध्ये बांधलेले गौरीशंकर मंदिर ही प्रेक्षणीय आहेत. दगड व सिमेंट यांचा वापर करून उभारलेल्या 10.6 मी. उंचीच्या टेकडीवर बांधण्यात आलेल्या गौरीशंकर मंदिरात गंगावतरणाचा अतिशय आकर्षक देखावा निर्माण करण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment