डॉ. भरत वाटवाणी
■ रस्त्यावरून
जाताना आपल्याला अनेकदा कळकट कपडे, दाढीचे खुंट वाढलेल्या अवतारातील काही
लोक दिसतात, पण आपण ते त्यांचे प्राक्तनच असे म्हणून दखलही
न घेता सहजपणे नजर वळवून निघून जातो. एक माणूस मात्र याला अपवाद होता. त्याने असेच
एकदा एका तरुण माणसाला रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारातील घाण पाणी पिताना
पाहिले. हे बघून दुसरा कुणीही किळस आल्याने दुर्लक्ष करून निघून गेला असता,
पण या माणसाचे हृदय मात्र हे बघून पिळवटले. त्याने त्या तरुणाला
ताब्यात घेऊन त्याला इतरांप्रमाणेच व्यवस्थित केले. या सहृदय माणसाचे नाव डॉ. भरत
वाटवाणी. बोरिवलीत वास्तव्य असलेले डॉ. वाटवाणी हे सामाजिक कार्यकर्ते व
मनोविकारतज्ज्ञ आहेत. त्यांना समाजसेवेतील नोबेल मानला जाणारा रॅमन मॅगसेसे
पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.
■ डॉ. वाटवाणी यांनी वर उल्लेख केलेल्या
त्या तरुणाला बरे केले. त्याची विचारपूस केल्यावर कळले की, तो
तरुण मुलगा हा बीएस्सी पदवीधर होता. त्याचे वडील आंध्र प्रदेशात मोठे अधिकारी
होते. असे अनेक लोक केवळ मानसिक दुरवस्थेमुळे पथभ्रष्ट होतात, त्यांच्या
घरातले त्यांना विचारत नाहीत. ज्यांना कुणाचा आधार नाही अशा रस्त्यावर बेवारस
भटकणाऱ्या अनेकांचा आधारवड म्हणजे डॉ. वाटवाणी. त्यांचा जन्म कोलकात्याचा.
वडिलांबरोबर ते मुंबईत आले. एमबीबीएस झाले. नंतर मनोविकारातील पदविका घेतली,
त्यामुळेच मनोरुग्णांच्या सेवेचा मार्ग प्रशस्त झाला. एरवी कुणालाही
नको असलेल्या लोकांचा स्वीकार करण्याला फार मोठे मानसिक धैर्य, मानवतेविषयी
आस्था लागते. ती त्यांच्यात ओतप्रोत भरलेली आहे. वयाच्या साठीत असलेले वाटवाणी व
त्यांच्या पत्नी डॉ. स्मिता यांनी एकूण सात हजार मनोविकारग्रस्त बेवारस व्यक्तींना
बरे करून त्यांना पुन्हा कुटुंबात स्थान मिळवून दिले. कर्जतला त्यांनी श्रद्धा
पुनर्वसन केंद्र सुरू केले असून तेथे एका वेळी अडीचशे तरी असे लोक उपचारासाठी
असतात. १९८९ मध्ये त्यांनी ही संस्था सुरू केली. उत्तर प्रदेश, महाराष्ट्र,
कर्नाटक, मध्य प्रदेश, नेपाळ,
बांगलादेशातील अशा लोकांना त्यांच्या सेवेचा लाभ झाला आहे. डॉ.
वाटवाणी यांना मिळालेल्या पुरस्काराने स्किझोफ्रेनिया व इतर मनोविकारांनी ग्रस्त
असलेल्या बेवारस लोकांची व्यथाही समाजापुढे आली आहे. त्यांच्या एकटय़ाच्या
प्रयत्नातून हा प्रश्न सुटणार नाही, कारण भारतात किमान असे १० लाख लोक
मनोविकारग्रस्त होऊन बेवारस झाले आहेत. त्यासाठी स्किझोफ्रेनियाविषयी जागृती तर
हवीच, पण त्यांना मदत करण्यासाठी सामाजिक चळवळ उभी
राहायला हवी.
No comments:
Post a Comment